सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १२ मार्च २०२६) :- हळद खरेदी करण्याच्या करारातून एका व्यावसायिकाची ११ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी ‘गारवीन स्पाईसेस अँड फूड प्रॉडक्ट कॉर्पोरेशन’च्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
चेतन मधुकर भोसले (वय ४२, रा. सत्यम रेसीडेन्सी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विनोद शांताराम सायगावकर (रा. रायगड, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद सायगावकर याने त्याच्या ‘गारवीन स्पाईसेस अँड फूड प्रॉडक्ट कॉर्पोरेशन’ या कंपनीसाठी फिर्यादी भोसले यांच्याकडून हळद खरेदी करण्याचा करार केला होता. या करारानुसार फिर्यादी यांनी आरोपीला १८ लाख ३५ हजार २७८ रुपयांचा माल पुरवला होता.
माल मिळाल्यानंतर आरोपीने त्या बदल्यात केवळ ६ लाख ७० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित ११ लाख ६५ हजार २७८ रुपये देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ९ जुलै २०२५ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत चिखलीतील ‘हॉट अँड स्पाइसी’ चायनीज सेंटरच्या परिसरात घडला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) बाबर करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.












