- मिक्सरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू..
- वाहनचालकाची घोडचुक नडली?…
- हाकेच्या अंतरावर पोलीस आयुक्तालय…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ मार्च २०२६) :- चिंचवडगावातील प्रेमलोक पार्क येथून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिक्सर ट्रकच्या धडकेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हा अपघात आज गुरुवारी (दि. १२) दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. विशेष म्हणजे ही घटना पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुक असे मृत मुलाचे नाव असून तो चिंचवडेनगर येथे राहत होता. फारुक सायकलवरून जात असताना मागून आलेल्या मिक्सरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मिक्सर ट्रकचा चालक मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवत असल्याची माहिती मिळतेय.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.












