- बाप-लेकावर हातोड्याने हल्ला..
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ मार्च २०२६) :- जुन्या सांगवी परिसरात मालमत्तेच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या वृद्ध वडिलांना लाथाबुक्क्यांनी व हातोड्याने निर्घृण मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिष श्याम ढोरे (वय ४३) आणि त्यांचे वडील श्याम ढोरे हे बुधवारी (दि. ११ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास जुनी सांगवी येथील ढोरे नगरमधील एका इमारतीतील तळमजल्यावरील फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले होते.
यावेळी तिथे उपस्थित असलेले आरोपी नारायण आत्माराम ढोरे, अभिजीत नारायण ढोरे आणि एक महिला आरोपी यांनी या जागेच्या मालकी हक्कावरून फिर्यादींशी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले. भांडण सुरू असताना आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
इतक्यावरच न थांबता, आरोपी नारायण आणि अभिजीत ढोरे यांनी फिर्यादींच्या वडिलांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने हातोड्याने जोरदार प्रहार केला. यामध्ये श्याम ढोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच फिर्यादी हरिष ढोरे यांनाही हातोड्याने मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करत आहेत.












