- तरीही, स्थायी सभेत चमकोगिरीला प्राथमिकता?..
- विद्युत कामांवर कोटींची उधळपट्टी..
- देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली ‘ठेकेदार’ धार्जिणे निर्णय?…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना आणि विकासकामांसाठी निधीची चणचण भासत असताना, स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून कोटींची उड्डाणे घेतली आहेत.
विशेष म्हणजे, अत्यावश्यक कामांना बगल देत विद्युत विभागाच्या अनावश्यक वाटणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामांवर तब्बल ८७ कोटींहून अधिक रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सुशोभीकरणाच्या नावाखाली पैशांचा धूर…
शहरात अनेक ठिकाणी रस्ते आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न प्रलंबित असताना, केवळ ‘आकर्षक रोषणाई’ आणि ‘AR-VR’ सारख्या तंत्रज्ञानावर १७.३५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. संभाजी महाराज पुतळा परिसरातील केवळ दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणासाठी ३२.४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ( ही कामे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कितपत गरजेची आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली ‘ठेकेदार’ धार्जिणे निर्णय?…
पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या प्रभागांत मिळून १ कोटी ३८ लाख रुपयांची कामांना मंजुरी दिली आहे. अनेक निविदा या मूळ दरापेक्षा २६% ते ३३% कमी दराने आल्या आहेत. इतक्या कमी दराने काम घेणारे ठेकेदार कामाचा दर्जा राखणार का? की हा केवळ कागदोपत्री सोपस्कार आहे, अशी शंका घेतली जात आहे.
पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, रोषणाईवर भर…
सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत असताना, महापालिका मात्र ३१.२६ लाख रुपये खर्चून चौक आणि कमानींचे सुशोभीकरण करत आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन (४२.९९ लाख) आणि इतर विद्युत कामांच्या नावाखाली वारेमाप खर्च दाखवून तिजोरीवर भार टाकला जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर सामान्यांच्या करातून जमा झालेला पैसा जनहितार्थाच्या कामांऐवजी केवळ ‘चकाकी’ आणणाऱ्या कामांवर खर्च करून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे? हा कळीचा मुद्दा म्हणावा लागेल.












