- अभिप्रायावर शहराची क्रमवारी ठरणार; महापालिकेचे सहकार्याची विनंती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१२ मार्च २०२६) :- स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत शहराची क्रमवारी ठरवताना नागरिकांचा अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता ॲप किंवा स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सकारात्मक अभिप्राय नोंदवावा, तसेच आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये अग्रस्थानी आणण्याचा निर्धार असून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरण करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कचरा संकलन, विलगीकरण, प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय देऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.












