- सोसायटी बैठकीत राडा; महिलेसह तिघांवर हल्ला, धमक्या देत अश्लील वर्तन..
- वेंडर बदलाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला; खुर्च्या-रॉडने मारहाण…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १७ मार्च २०२६) :- तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये फेडरेशनच्या बैठकीदरम्यान झालेल्या वादातून मोठा गोंधळ उडाला. बैठकीत वेंडर बदलण्याचा मुद्दा मांडल्यामुळे महिलेला बोलू न दिल्याने वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फेज १ मधील क्लब हाउसमध्ये घडली. महिला फिर्यादी यांनी बैठकीत आपला मुद्दा मांडत असताना आरोपींनी त्यांना विरोध करत दमदाटी केली. “आमचेच कॉन्ट्रॅक्ट आहे, बदलण्याची हिम्मत करू नका,” अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी हेमंत सपकाळ यांनी शांततेने चर्चा करण्याचे आवाहन केले असता आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यानंतर फिर्यादी आणि शांताराम कोकाटे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून खुर्च्या व लोखंडी रॉडने तिघांनाही मारहाण केली.
तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतरही आरोपींकडून फिर्यादी व त्यांच्या मुलीकडे अश्लील चाळे करत अपमानास्पद वर्तन करण्यात आले. तसेच “किशोर आवारेप्रमाणे तुमचीही हत्या करू” अशी गंभीर धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी विराज खळदे, भावेश खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे, महेश खळदे, भूषण खळदे आणि मतिन (अध्यक्ष, ए विंग) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व भादवीच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर करीत आहेत.








