न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १७ मार्च २०२६) :- तळेगाव दाभाडे परिसरात निष्काळजीपणामुळे घडलेल्या धक्कादायक अपघातात ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गॅस डिलिव्हरी वाहन चालकाने हँडब्रेक न लावता वाहन उतारावर उभे केल्याने हे दुर्दैवी प्रकरण घडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका सोसायटीसमोर, सोमाटणे गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, चौराईनगर येथे घडली. आरोपींनी गॅस डिलिव्हरी करताना वाहन योग्य प्रकारे सुरक्षित न ठेवता निष्काळजीपणे उभे केले. हँडब्रेक न लावता व गिअरमध्ये न ठेवता वाहन उभे केल्यामुळे ते अचानक पुढे सरकले.
या वेळी ज्ञानेश्वरी गुहे (वय ११) ही मुलगी रस्त्यावर असताना वाहनाने तिला पाठीमागून धडक दिली व तिच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपींनी जखमी मुलीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता व पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी यश हनुमंत कराळे (वय २२) यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधाराम बिश्नोई व ओमप्रकाश बिश्नोई यांच्यासह संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.














