न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ मार्च २०२६) :-इमारतीवरून उडी मारून एका २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६ मार्च) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.
सिमरन विजय दांडगे (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीवरून एका तरुणीने उडी मारल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात सिमरन हिने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचे निष्पन्न झाले. गंभीर जखमी अवस्थेत तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात करण्यात आले.








