- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे स्पष्ट निर्देश..
- सोसायट्यांवर भार टाकल्यास कठोर कारवाई…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- महानगरपालिका हद्दीत फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारून लेखी हमीपत्र देणाऱ्या विकसकांनी ती काटेकोरपणे पार पाडावी, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या १० एप्रिल २०२३ रोजीच्या आदेशानुसार स्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार अध्यक्षस्थानी होते. तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांच्यासह पुणे महापालिका व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. भामा-आसखेड व आंद्रा पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याने सध्या सर्व क्षेत्रांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विकसकांनी दिलेल्या हमीपत्रांचे पालन करण्याचे निर्देश दिले. जबाबदारी टाळून सोसायट्यांवर आर्थिक भार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
तसेच सर्व नाहरकत प्रमाणपत्रे आणि हमीपत्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांना माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी महापालिकेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
















