- निवृत्ती महाराज इंदुरीकर, आनंद पिंपळकर, एम. ए. हुसेन आणि डॉ. मनोज देवळेकर यांचा सन्मान…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त यावर्षीचे अहिंसा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक ३१ मार्च रोजी अहिंसा पुरस्कार, अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा आणि भक्ती संध्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर (अध्यात्म), वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर (वास्तुशास्त्र व समाजसेवा), सेवाभावी समाजसेवक एम. ए. हुसेन (मानव सेवा) आणि ज्ञान प्रबोधिनीचे केंद्र संचालक डॉ. मनोज देवळेकर (शिक्षण क्षेत्र) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महासंघाच्या वतीने दरवर्षी शाकाहाराचे पालन करणाऱ्या व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे, बाबासाहेब पुरंदरे, उल्हासदादा पवार, शेखर गायकवाड आणि गुरु गोविंद गिरी महाराज यांसारख्या मान्यवरांना हा सन्मान देण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना पुरस्कार समितीचे प्रमुख व संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, उमेश पाटील, विलासकुमार पगारिया तसेच विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी ही घोषणा केली.
महावीर जयंतीनिमित्त होणाऱ्या या उपक्रमांमुळे समाजात अहिंसेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
















