- २९ दिवसांत १५७ कोटींची विक्रमी वसुली, ३१ मार्च २०२६ पर्यंत योजनेचा कालावधी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा २९ मार्च २०२६ पर्यंत ५५ हजार ७११ थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. ही योजना लागू झाल्यापासून म्हणजेच १ मार्च २०२६ पासून २९ मार्च २०२६ या २९ दिवसांमध्ये तब्बल १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. अभय योजनेचा कालावधी हा ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांनी तो ३१ मार्च २०२६ पूर्वी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी १ मार्च २०२६ पासून अभय योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक थकबाकीदार नागरिकांनी पुढाकार घेत थकबाकी भरून अभय योजनेचा लाभ घेतला आहे. नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे कर वसुलीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या २९ दिवसांमध्ये आतापर्यंत एकूण ६८ हजार ४८८ मालमत्ताधारकांनी १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ५५ हजार ७३१ थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना एकूण ३८ कोटी ८१ लाख रुपयांची दंडावरील सवलत देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, महापालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला असून, ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. त्यामुळे अद्यापही मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी या अंतिम संधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत असून, मालमत्तेच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ऑनलाइन पेमेंट, धनादेशाद्वारे भरणा आणि कॅश काउंटर अशा विविध माध्यमांद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांचे कॅश काउंटर ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
अभय योजना ही नागरिकांना दिलासा देणारी आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीस बळकटी देणारी योजना ठरली आहे. पिंपरी चिंचवडकरांनी दाखवलेला प्रतिसाद हा शहराच्या विकासाबाबतच्या बांधिलकीचा पुरावा आहे. उर्वरित थकबाकीदारांनीही शेवटच्या दिवशी पुढाकार घेऊन या संधीचा लाभ घ्यावा.
-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.अभय योजनेमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून, थकबाकीदारांना दिलासा देण्याचा उद्देश साध्य होत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरणे ही सकारात्मक बाब आहे नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, कोणत्याही अडचणीशिवाय नागरिकांनी कर भरावा.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.








