न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ०६ एप्रिल २०२६) :- तळेगाव दाभाडे परिसरातील मावळ गेट हॉटेल येथे उधारीच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकावर गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अमित पोटगळे (वय ४५, रा. मामुर्डी) यांनी बीअरचे १०० रुपये “उद्या देतो” असे सांगितल्याच्या कारणावरून हा वाद चिघळला.
यावेळी आरोपी किरण ठोबरे व हॉटेलमधील तीन वेटर यांनी पोटगळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीमध्ये त्यांच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली असून उजव्या डोळ्याला मार लागून डोळा काळा झाला आहे. तसेच जबडा, छाती यांवरही मार बसला असून उजव्या पायातील हाड फ्रॅक्चर झाले आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.










