- अनं…बाकी सगळी ‘सिनेमा स्टाईल’ खेळी…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०६ एप्रिल २०२६) :- चाकण परिसरातील माणिक चौकात घडलेला फसवणुकीचा प्रकार अगदी ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटाला साजेल अशा सीनची आठवण करून देणारा ठरला. चित्रपटात जसं परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षयकुमार यांनी गुंडांना नकली नोटा देत फसवले; तसाच काहीसा प्रकार येथे प्रत्यक्षात घडला.
अशी घडला प्रसंग…
हुजेब बागवान यांची आल्टो कार खरेदी करण्यासाठी दोन ‘हुशार’ ग्राहकांनी ३.५ लाखांचा व्यवहार ठरवला. “आता ३ लाख देतो, उरले नंतर” अशी गोड बोलणी करत त्यांनी नोटांचे बंडल दिले आणि “गाडीची पूजा करून येतो” म्हणत थेट फरार झाले. फिर्यादीने बंडल उघडून पाहिले तर वर-खाली आणि मध्ये मिळून फक्त ३ च खऱ्या नोटा, बाकी सगळी खेळण्यातील! म्हणजे अगदी ‘सिनेमा स्टाईल’ सेटअपच!
दरम्यान उत्तर चाकण पोलिसांनी ‘हेराफेरी’ करणाऱ्यांना जास्त वेळ मोकळे सोडले नाही. तपास करत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.“चित्रपटात चालतं, पण वास्तवात नाही!” असा संदेश देत या घटनेने परिसरात चांगलीच चर्चा रंगवली आहे.










