- गाळातून गुलाब शेतीही फुलली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २७ एप्रिल २०२६ ) :- पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने धरणातून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाचा कोणताही निधी न घेता लोकसहभागातून गाळ काढला जात आहे. गाळ काढल्याने धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली असून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत नाही. खा. श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला आहे.
पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, सोमनाथ कोंडे, मदनभाऊ शेडगे, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, भगवान भिकोले, माजी सरपंच लाला गोंते, माजी उपसरपंच काळूभाऊ उंबरकर, अक्षय उंबरकर, भगवान दरेकर, बाळासाहेब दरेकर, एकनाथ दरेकर, अमित मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या ५० वर्षांपासून पवना धरणातील गाळ काढला जात नव्हता. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून धरणातील गाळ काढण्यास सुरुवात केली. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागले नाही. उन्हाळ्यात देखील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ काढण्याचे काम चालू राहणार आहे.
गाळातून गुलाब शेतीही फुलली
पवना धरणातील काढलेला गाळ मावळातील शेतकऱ्यांना निशुल्क दिला जातो. मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुलाबाची जगात निर्यात केली जाते. गुलाब शेतकऱ्यांना पोयटा मातीचा फायदा होता. त्यामुळे गुलाबाच्या उत्पन्नात भर पडते. गुलाबाच्या शेतीतही वाढ झाली. पाणीसाठवण क्षमताही वाढली आणि गुलाबाची शेतीही फुलल्याने नागरिकांना दुहेरी फायदा होत आहे.










