न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर शासनाने दि ०६ जून २०१९ रोजी अमित गोरखे यांची नियुक्ती केली आहे. या अनुषंगाने त्यांनी मंगळवार (दि ११) रोजी मुंबईतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीतील मुख्य कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना गोरखे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास टाकला व महामंडळास सुस्थितीत आणण्यासाठी माझी अध्यक्षपदी निवड केली, याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचा व शासनाचा आभारी आहे. तळागाळातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व तस्यम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुरू असलेल्या अनेक योजना गेल्या चार साडेचार वर्षापासून बंद अवस्थेत होत्या. त्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्यासाठी कसोशीने निष्ठेने प्रयत्न करणार, असा विश्वास कार्यभार स्वीकारताना अमित गोरखे यांनी व्यक्त केला.














