- ताथवडेत अतिउच्चदाब उपकेंद्राची उभारणी..
- मामुर्डीतील उपकेंद्राचे मजबुतीकरण..
- महावितरणाच्या आढावा बैठकीत विविध प्रकल्पांना मंजुरी…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून महावितरणकडून विविध ठिकाणी उपकेंद्रे आणि अतिउच्चदाब केंद्र उभारण्यास गती देण्यात आली आहे.
पिंपरी, चिंचवड, थेरगाव, रावेत तसेच तीर्थक्षेत्र देहूगाव येथे नवीन उपकेंद्रांची निर्मिती केली जाणार असून या माध्यमातून वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्याचा उद्देश आहे.
महावितरणाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रादेशिक संचालक सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, युवराज जरग तसेच संजय नेते, सोमनाथ मुंडे, शेखर मुरकुटे आणि केशव काळुमाळी उपस्थित होते.
ताथवडे येथे अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून यशदा संस्थेच्या जागेत हे केंद्र उभारण्यात येणार आहे. संबंधित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रहाटणी येथेही उतिउच्चदाब केंद्र सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर असून नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत.
मामुर्डी येथील विद्यमान उपकेंद्राचे मजबुतीकरण करण्यात येणार असून २२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. तसेच तळेगाव एमआयडीसीमधील आंबी येथील अतिउच्चदाब केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून औद्योगिक तसेच निवासी भागांना अधिक विश्वसनीय वीजपुरवठा मिळणार आहे.












