न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १ मे २०२६) :- मावळ तालुक्यात महाराष्ट्र व कामगार दिनाच्या सुट्टीदरम्यान पाण्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) येथे तिघांचा, तर साळुंब्रे येथील पवना नदीत एका तरुणाचा मृत्यू झाला.
जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी पाच जण पाण्यात उतरले असता खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यात अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार यांचा मृत्यू झाला, तर दोघांना ग्रामस्थांनी वाचवले.
दरम्यान, साळुंब्रे येथे मनोज भारत गौतम (वय २५) हा तरुण नदीत पोहताना बुडाला. स्थानिक बचाव पथक, शिवदुर्ग मित्र व एनडीआरएफ यांनी संयुक्त कारवाई करत मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी संबंधित रुग्णालयात हलविण्यात आले.












