न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मे २०२६) :- पिंपरी येथील साई चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशिष जगन्नाथ वाळुंज (वय ३० वर्षे) हे आपले मित्र मनोज दिलीप पुंड (वय ३४ वर्षे) यांच्यासह दि. ०४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास साई चौक येथील हॉटेल रौनक येथे जेवणासाठी गेले होते. त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर वेटर अजीज याने हॉटेल बंद झाल्याचे सांगत ओरडल्याने फिर्यादी यांनी त्याला शांतपणे बोलण्यास सांगितले.
यावरून संतप्त झालेल्या आरोपी अब्बास असादुन शेख (वय ३०), मोहंमद अजिज आशान शेख (वय २१) आणि पंकज उर्फ बंटी शंकर भुमकर (वय ३०) यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला हॉटेलबाहेर नेऊन स्वयंपाकघरातील झाऱ्यासह इतर वस्तूंनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यावेळी आरोपींपैकी एकाने हातातील झारा हवेत फिरवत “कोणी मध्ये आले तर सोडणार नाही” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक घाबरून पळून गेले.
या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि कांबळे करत आहेत.













