- महापौरांना घेराव; पुन्हा सभा काही वेळ तहकूब करण्याची महापौरांवर नामुष्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आज मंगळवारी पार पडत असलेल्या महापालिकेच्या सभेत पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय तहकूब ठेवण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा संताप अनावर झाला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चक्क या विषयावरून महापौरांना घेराव घातला आहे. त्यामुळे महापौर रवि लांडगे यांनी सभा १५ मिनिटे तहकूब ठेवली आहे.
भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी महापौरांच्या सूचनेवरून विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक १. स्वीकृत नगरसेवकांच्या विषयाची उपसूचना वाचली. त्याला नगरसेवक कुशाग्र कदम यांनी अनुमोदन दिले. त्यावर भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी हा विषय तहकूब करण्याची महापौरांना विनंती केली. तेवढ्यात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी याला आक्षेप घेतला.
भोईर म्हणाले, ‘आमची तीन नावे जाहीर करा. तुमची नावे पुढच्या वर्षी जाहीर करा. आमची काही हरकत नाही. आमची नावे प्रशासनाकडून पुढे आली आहेत. त्यामुळे विषय तहकूब ठेवू शकत नाहीत. नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करतो. तुमचे भाजपचे लोकंही याला वैतागले आहेत. ते आमच्याशी खासगीत नेत्यांच्या कानावर विषय घालण्याची आमच्याकडे मागणी करतात. पण आम्ही तुम्हाला त्रास नको म्हणून सांगत नाहीत. त्यामुळे तुम्ही आमचा विषय मंजूर कराच.
अस म्हणताच भाजपचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी भोईर यांना तुमच्या नावाबद्दल आमचा आक्षेप नसल्याचे सांगत. हा विषय तहकूब करण्याची महापौरांकडे मागणी केली. महापौरांनी हा विषय तहकूब केला.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सभेत गोंधळ….
दरम्यान राष्ट्रवादीच्या चमूतील नगरसेवक आणि नगरसेविकांनी महापौरांना घेराव घातला. शहराचा विकास थांबल्याचे सांगत महापौरांसमोरच जोरजोरात आरडाओरडा केला. सभात्याग करण्याचा प्रयत्न होईल अशी शक्यता दिसताच महापौरांनी तेवढ्यात एक नाव राहिले आहे. १५ तारखेला विषय मंजूर होण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे समाधान न झाल्याने गोंधळ आणखीनच वाढला. तेवढ्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पाणी पुरवठ्याचा विषय गंभीर आणि महत्वाचा असल्याचे सांगत बाकीचे विषय १५ तारखेला होतील असं सांगत गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही गोंधळ वाढतच गेला. शेवटी महापौरांनी सभा १५ मिनिटे तहकूब केली.












