- नराधमाच्या विकृतीचा नगरसेवकांनी केला सभेत निषेध..
- पिडीत मुलीला श्रद्धांजली वाहत सभा तहकूब…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मे २०२६) :- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिला निर्घृणपणे संपवल्याची घटना १ मे रोजी घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद आज मंगळवारी पिंपरी चिंचवड महापालिकेत आयोजित सर्वसाधरण सभेत उमटले.
लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी करीत पिडीत मुलीला श्रद्धांजली अर्पण करून ही सभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर तहकूब सभेचे कामकाज पूर्वरत होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते.
दरम्यान विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, मुलीचं संगोपन कस करावं याची मला चांगलीच माहिती आहे. कारण मीही मुलीचा बाप आहे. वाढत्या तक्रारींवर पोलीस आयुक्तांसोबत बैठक घ्या. स्पेशल हेल्पलाईन किंवा वेगळा टास्क तयार करा. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत पोलिसांवर देखील वचक राहावा यासाठी महापौरांनी कडक पाउले उचलावीत, असे ते सभेत म्हणाले.
स्थायी सभापती अभिषेक बारणे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या, असे सांगत करत कायदा विभाग सजग रहावा. पोलीस आयुक्तांसोबत तत्काळ मिटिंग घ्या. यावर काय उपाययोजना केल्या ते पुढील सभेत जाहीर करत आयुक्तांनी खुलासा करावा, असेही ते म्हणाले.
पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, भौतिक सुविधा हव्याच पण संस्कारही हवेत. पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली. पोलीस म्हटले की नागरिकांना भीती वाटते. त्यामुळे विकृती वाढते आहे. लवकरच पोलीस आयुक्तांसोबत आमची बैठक घ्या.
यावेळी नगरसेवक कुशाग्र कदम, जितेंद्र ननावरे, हर्षल ढोरे, गटनेते विश्वजित बारणे, विनोद नढे यांच्यासह नगरसेविका सुलभा उबाळे, नीता पाडळे, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, शकुंतला धराडे, रविना आंगोळकर, अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर आदींनी आपल्या भावना सभागृहात व्यक्त केल्या.
नगरसेवक उत्तम केंदळे यांनी सभा तहकुबीला अनुमोदन देत महापौरांकडे सभा तहकुबीची विनंती केली.
दरम्यान महापौर रवि लांडगे यांनी दोन दिवसात पोलीस आयुक्तांसोबत मिटिंग घेण्याचे आश्वसन देत, सभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब केली.













