- शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी नियुक्ती..
- विरोधकाची कसर भरुन काढण्याचा चेतनदादांचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ मे २०२६) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांना प्रभावीपणे आव्हान देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्थानिक स्तरावर परस्परविरोधी भूमिका घेत असले, तरी राज्य पातळीवर सत्तेत एकत्र असल्याने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यावर काही मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर चेतन पवार यांच्या नेतृत्वातून शिवसेना शहरात ठोस आणि स्पष्ट विरोधी भूमिका मांडेल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
चेतन पवार यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यापूर्वी त्यांनी युवासेना शहरप्रमुख म्हणूनही काम पाहिले असून, संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘मातोश्री’वरून त्यांच्यावर शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
“पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध योजना राबविणार आहे. तळागाळात पक्षाची विचारधारा रुजवून नागरिकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवू. सत्तेत आणि विरोधात असलेले पक्ष राज्यात एकत्र असल्याने त्यांच्या विरोधाची धार कमी झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्षच शहरात खऱ्या अर्थाने विरोधकांचा आवाज ठरेल.”
– चेतन पवार, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…












