- भर सभेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ओढला आसूड..
- कायदा-सुव्यवस्था ढासाळल्याचा केला आरोप..
- महापालिकेचे नगरसेवक लवकरच घेणार पोलिसांची शाळा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत महापालिकेच्या तहकूब सभेत पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची कार्यपद्धती अप्रत्यक्षपणे रडारवर आणत लवकरच त्यांच्यासोबत विशेष बैठक घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान महापौर रवि लांडगे यांनी दोन दिवसात पोलीस आयुक्तांसोबत मिटिंग घेण्याचे आश्वसन दिल्यानंतर सन्माननीय नगरसेवक शांत झाले.
काळेवाडीमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार झाले. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी गेले असता त्यांना साक्षीदार आणा असे सांगण्यात आले. सुदैवाने ती मुलगी वाचली मात्र, तिच्या घरच्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील. आपल्या घरात अशी घटना घडलेली असतानाही पोलिस प्रशासन गंभीर नाही. लोकप्रतिनिधींना देखील या शहरातील पोलीस प्रशासन दाद देत नाही. तर सर्वसामान्यांचे काय ? आम्ही कोणाकडे न्याय मागणार ? असे म्हणत सन्माननीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत पिंपरी चिंचवड पोलिसांविषयी संताप व्यक्त केला.
मंगळवारी एप्रिल महिन्याची तहकूब सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते. भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी चाकणमध्ये एका चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करत ठार केले. यावरून बोलत असताना नगरसेवकांनी पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील अशा घटना घडत असताना पोलिस प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे वाभाडे काढले.
नगरसेविका नीता पाडाळे यांनी पंधरा दिवसांपूर्वी काळेवाडी परिसरामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत आपल्या घरातील मुली देखील सुरक्षित नसल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, काळेवाडीत एका मुलीवर अमानुष अत्याचार झाला आहे. त्याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल न करता साक्षीदार आणण्याचा सल्ला दिला.
नगरसेवक विनोद नढे म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस हफ्तेखोरीमध्ये व्यस्त आहेत. तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला. त्यानंतर तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. सुदैवाने ती मुलगी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही गेलो असता तेथील पोलिसांचे वर्तन चांगले नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आहेत. त्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. अशाप्रकारे गांभीर्य नसलेले आणि संवेदना बोथट झालेल्या पोलिसांची गरज नाही. आज शहरातील प्रत्येक पानटपरीवर गांजा, ड्रग्ज मिळत आहेत. पोलीस फक्त हफ्तेखोरीमध्ये व्यस्त आहेत.
नगरसेवक विश्वजीत बारणे म्हणाले, कासारवाडीमध्ये ५० किलो गांजा पकडण्यात आला. कूठून येत आहे हे सर्व याची चौकशी झाली पाहिजे.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर चर्चा होते. यापलिकडे आपल विश्व नाही. उपाययोजना काय करणार यावर चर्चा झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड पोलिसांची बैठक घेत शहरातील उपाययोजना काय हा प्रश्न त्यांना करावा लागेल. शाळांमधील ८० टक्के सीसीटीव्ही बंद आहेत. स्पेशल हेल्पलाइन चालू करावी. बऱ्याच पोलीस स्टेशनंला दखल घेत नाहीत. आपल्या संवेदना बोथट नको असे म्हणत पोलिसांसोबत बैठक लावण्याची सूचना केली.
शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, दक्षता समित्या कागदावर आहेत. असेच सुरू राहिल तर आपल्या राज्याचा बिहार होईल. परप्रांतीय आले आहेत. भाडेकरू राहत आहेत त्यांचे रेकॉर्ड पाहिजे. या सगळ्या सूचना महापालिकेच्या वतीने पोलीसांना द्या. परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही पोलीसांची वर्तवणूक सुधारू, असा इशारा दिला.













