न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला व साहित्य समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चार महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रावर सखोल चर्चा झाली.
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांत कला केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महापालिका स्पर्धांतील खेळाडूंना अपघाती विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांसाठी जलतरण तलाव व क्रीडा सुविधांमध्ये शुल्क सवलत आणि विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. क्रीडा विभागाचे नाव ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक विभाग’ असे करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या निर्णयांमुळे खेळाडू, कलाकार व नागरिकांना अधिक संधी मिळून शहराच्या सांस्कृतिक व क्रीडा विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.













