- ‘तीन पत्ती’ खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल..
- लिंबोरे वस्ती परिसरातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. ११ मे २०२६) :- दापोडी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या लिंबोरे वस्ती परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दापोडी पोलिसांनी रविवारी (१० मे) सायंकाळी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण २४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्रा शेडमध्ये काही लोक पैशांच्या आमिषाने ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या जुगार खेळताना रंगेहात मिळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. १. अशोक जग्गानाथ भालेसैन (वय ५२, रा. दापोडी), २. विशाल ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४४, रा. दापोडी), ३. चेतन किसन भाडाळे (वय ३६, रा. दापोडी), ४. मनोज दिलीप पवार (वय ४०, रा. दापोडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सागर आनंद जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेंडगे करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याने जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.













