- पत्नीला पट्ट्याने मारहाण; धारदार हत्याराने मुलालाही केलं जखमी..
- तळवड्यातील रुपीनगरमधील धक्कादायक प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ११ मे २०२६) :- घरच्यांनी फक्त ‘लाईट बंद करून झोपायला’ सांगितले याचा राग अनावर झाल्याने एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, त्याने पत्नी आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तळवडे येथील रुपीनगरमध्ये घडली आहे.
याप्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी पती सुभाष केशव उत्तेकर (वय ४५, रा. तळवडे) याला अटक केली आहे. याबाबत पत्नी मानसी सुभाष उत्तेकर (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १० मे) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी सुभाष उत्तेकर हा दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला विनाकारण शिवीगाळ करू लागला. रात्रीची वेळ असल्याने फिर्यादी पत्नीने घरातील लाईट बंद करून झोपायला सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरू असताना आरोपीने जवळ असलेल्या हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार केले. आईला वाचवण्यासाठी मुलगा ज्ञानेश्वर मध्ये आला असता, आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या हनुवटीवर, खांद्यावर, गळ्यावर आणि डाव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करत आहेत.
















