- ‘आपदा मित्र’ नियुक्तीला मंजुरी..
- मान्सूनपूर्व तयारीसाठी ५० प्रशिक्षित स्वयंसेवकांची नेमणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीची पाक्षिक सभा बुधवारी (दि. १३ मे) सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात पार पडली. सभेला विधी समिती सभापती, सदस्य तसेच नगरसचिव उपस्थित होते.
सभेत दोन महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या विविध विभागांमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या निरुपयोगी भंगार साहित्याच्या ई-लिलावाचा विषय सदस्यांनी अधिक तपशीलाची मागणी करत तहकूब केला, तर मान्सूनपूर्व तयारीसाठी ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागांमधील जुने आणि फेरवापरास अयोग्य ठरलेले भंगार साहित्य “जेथे आहे, जसे आहे” या तत्वावर ई-लिलावाद्वारे विक्री करण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. या साहित्याचे मूल्यांकन मे. ए. व्ही. शेवडे अँड असोसिएट्स, पुणे यांनी केले असून एकूण अंदाजित विक्रीमूल्य १ कोटी ६ लाख २४ हजार ६०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या साहित्याचा ई-लिलाव करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रस्तावात भंगार साहित्याचा सविस्तर तपशील नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्याने हा विषय तहकूब करण्यात आला.
दरम्यान, मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज सक्षम करण्यासाठी ५० प्रशिक्षित ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ नियुक्त करण्याच्या विषयाला समितीने मंजुरी दिली. हे स्वयंसेवक राज्य अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल किंवा शासनमान्य संस्थांकडून प्रशिक्षित असणार आहेत. त्यांना पाच महिन्यांसाठी मानधन तत्वावर नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येकाला दरमहा २२ हजार ४८५ रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी एकूण ५६ लाख २१ हजार २५० रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो “अस्थायी आस्थापना” या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.














