- महापालिकेत अनुकंपा तत्वावरील नोकरीचे आमिष दाखवत लाखांची फसवणूक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :- महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत किरण कृष्णात ठोंबरे (वय ४४, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशिष अशोक उबाळे (रा. दापोडी) याने फिर्यादी यांना आपण पुणे महानगरपालिकेत आयुक्त आणि प्रशासन विभागाचे प्रशासकीय सचिव असल्याचे सांगितले. तसेच महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर सहा जागा रिक्त असल्याचे भासवून त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.
आरोपीने क्लार्क आणि शिपाई पदावर नियुक्ती करून देण्याचे सांगून फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने १६ लाख १८ हजार ५०० रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आटवे करीत आहेत.














