न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरात १६ मे २०२६ पासून झाली असून ही प्रक्रिया १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान नियुक्त प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करत आहेत. नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच स्व-नोंदणी केलेल्या नागरिकांनी स्वयं नोंदणी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
घरयादी व घरगणना प्रक्रियेत घरांची स्थिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि उपलब्ध नागरी सुविधांची नोंद केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे शासन विकासकामांचे नियोजन आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.
“जनगणना ही शहराच्या भविष्यातील गरजा ओळखण्याचे प्रभावी माध्यम आहे,” असे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.














