- घरगुती पाईप गॅस वापर वाढविण्यासाठी महापालिका, एमएनजीएल आणि गृहनिर्माण संस्थांची संयुक्त मोहीम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून भविष्यात शहराला देशातील पहिले “एलपीजी विरहित शहर” बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), गृहनिर्माण संस्था आणि सहकार विभागाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडली.
बैठकीत डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. नैसर्गिक वायू हा सुरक्षित, अखंडित आणि पर्यावरणपूरक पर्याय असल्याने प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सोशल मिडीया मोहिमा, माहितीपत्रके, प्रशिक्षण शिबिरे आणि सोसायटी भेटी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच एमएनजीएलने समन्वय अधिकारी नियुक्त करून नागरिकांच्या शंका आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला.














