न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीत मैलामिश्रित, रसायनयुक्त पाणी तसेच जनावरांचे मांस टाकले जात असल्याने नदीचे पाणी अत्यंत दूषित झाले आहे.पवना नदी मृत झाली आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालात हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शहराची लोकसंख्या ३२ लाखांवर पोहोचल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. महापालिका दररोज पवना नदीतून ५५० एमएलडी पाणी उचलते, मात्र हे पाणी दूषित असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. बाधित शेतकरी, स्थानिक नागरिक, आंदोलक आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी बारणे यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे.














