- रावेतमधील ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’वर पोलिसांची कारवाई..
- ‘प्रायव्हेट कॅफे’चे वाढते प्रमाण चिंताजनक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- रावेत परिसरातील एका कॅफेमध्ये कॉफी शॉपच्या आडून तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’च्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई रविवारी सायंकाळी रावेत येथील ‘कॅफे क्रेझी लव्हर’ येथे करण्यात आली. याप्रकरणी अशोक वाघमारे (पोलीस शिपाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास काशिद (वय २४, मालक – क्रेझी लव्हर्स कॅफे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणताही वैध परवाना नसताना कॅफेमध्ये कॉफी बोर्ड लावून व्यवसाय सुरू ठेवला होता. तसेच कॅफेच्या वरच्या मजल्यावर अंधाऱ्या खोल्यांमध्ये मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. त्या ठिकाणी अश्लील चाळे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा कॅफेंची नियमित तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा / २८७६ पी. ए. शेलार करीत आहेत.
‘प्रायव्हेट कॅफे’चे वाढते प्रमाण…
विशेष म्हणजे शहरात अल्पवयीन आणि तरुणांमध्ये अशा ‘प्रायव्हेट कॅफे’चे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनत आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बंदिस्त खोल्या, अंधार आणि गोपनीयतेच्या नावाखाली गैरप्रकारांना खतपाणी घातले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.














