- राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता; तर, भाजपच्या डावपेचांवर संशय?..
- राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे प्रबळ इच्छुक…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुणे विधान परिषद मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत मोठी अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याची जागा भाजपच्या ताब्यात घेण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असताना ही जागा भाजपला देण्याची चर्चा सुरू झाल्याने स्थानिक नेते संतप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी “महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार” असे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून तणाव वाढल्याचे दिसत आहे. भाजपकडून पुण्याऐवजी परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र राष्ट्रवादीने पुण्यासह दोन्ही जागांवर दावा कायम ठेवल्याने पेच अधिकच वाढला आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. “संख्याबळ आमचे अधिक असताना भाजपला पुण्याची जागा का द्यायची?” असा सवाल अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजी आमदार विलास लांडे, सुनील टिंगरे प्रबळ इच्छुक…
दरम्यान, राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमधून विलास लांडे यांचे नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आले असून, पुण्यातून माजी आमदार सुनील टिंगरे हे देखील इच्छुक असल्याची माहिती आहे. मात्र उमेदवारीपेक्षा जागेवरूनच महायुतीत संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडींमुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.














