- चिंचवडच्या ऑटो क्लस्टर कार्यालयातून चालतोय प्रशासकीय करभार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरिकाभिमुख प्रशासनाचा दावा पुन्हा एकदा फोल ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आठवड्यातून दोन दिवस नागरिकांना भेटण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात त्या दिवशीच आयुक्त कार्यालयात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पूर्वी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिकाऱ्यांना भेटण्याची सुविधा होती. मात्र नव्या आदेशानुसार ती केवळ मंगळवार आणि गुरुवारी, तेही फक्त दोन तासांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. त्यातही आयुक्त बहुतेक वेळ चिंचवडच्या ऑटो क्लस्टर कार्यालयातून कामकाज करत असल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
आयुक्तांच्या अनुपस्थितीप्रमाणेच अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुखही भेटीच्या वेळेत कार्यालयात उपलब्ध नसतात. “बैठकीत आहेत”, “साईटवर गेले आहेत” अशी ठरलेली उत्तरे नागरिकांना दिली जातात. प्रशासनाने केलेले नियम प्रशासनच पाळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.














