- जाब विचारताच पालिकेसह नागरिकांवर बिनबुडाचे आरोप..
- परिसरात पाणी साचत असल्याने रोगराईचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काळेवाडी परिसरात Maharashtra Natural Gas Limited (एमएनजीएल) कडून पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर करण्यात आलेल्या दुरुस्ती कामावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटपाथ पूर्ववत करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी बसवण्यात आलेले गट्टू काही दिवसांतच हलू लागले आहेत. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर आणि फुटपाथवर पाणी साचत असल्याने पादचारी आणि वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
“एमएसजीएलने खोदकाम केल्यानंतर परिसराची अवस्था बिकट झाली आहे. त्यानंतर महापालिकेकडून करण्यात आलेले दुरुस्ती काम हे केवळ दिखाव्यासाठी असून दर्जाहीन पद्धतीने करण्यात आले आहे,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ परिसरातील नागरिक एकत्र आले असून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच संपूर्ण कामाची चौकशी करून पुन्हा दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमित पवार म्हणाले, “दुरुस्तीचे काम संबंधित परिसरात सुरू असून ते काही दिवसांत पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे तत्काळ कारवाई करता येणार नाही.”
दरम्यान, संबंधित ठेकेदारानेही आपली बाजू मांडताना सांगितले की, “गट्टू कमी पडल्यामुळे काही काम अर्धवट ठेवावे लागले. परिसरातील काही लोकांनी गट्टू चोरून नेल्याचाही प्रकार घडला आहे. हे दुरुस्तीचे काम असल्याने नवीन गट्टू लावता येत नाहीत. तसेच महापालिकेकडेही सध्या गट्टू शिल्लक नाहीत.”














