न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ मे. २०२६) :- पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऊर्जा बचत आणि खर्च नियंत्रणासाठी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार परदेश दौरे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असून नवीन दौरेही नियोजित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामांसाठी कमी वाहनांचा वापर करावा, कारपुलिंगला प्राधान्य द्यावे तसेच मेट्रो, रेल्वे आणि पीएमपीएमएलसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम आणि चर्चासत्रे शक्यतो ऑनलाइन घेण्यावर भर देण्यात आला आहे.
कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर वाढविणे, वातानुकूलित यंत्रणांचे तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवणे तसेच शाळा, रुग्णालये आणि महिला वसतिगृहांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन सल्लागार नियुक्ती टाळण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेवर आर्थिक ताण वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.













