- नगरसेविका अनिताताई काटे यांची महापौरांसह आयुक्तांना निवेदन…
- उद्घाटन रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २५ मे २०२६) :- पिंपळे सौदागर येथील नव्याने उभारण्यात आलेले आधुनिक योगा पार्क तातडीने उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरात नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महानगरपालिकेमार्फत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे योगा पार्क उभारण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण होऊन बराच कालावधी उलटल्यानंतरही अद्याप पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले नसल्याने ते नागरिकांच्या वापरासाठी बंदच आहे.
या पार्कमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि नियमित व्यायामासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु पार्क बंद असल्याने नागरिक या सुविधेपासून वंचित राहत असून परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरसेविका अनिताताई काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दीर्घकाळ पार्क बंद राहिल्यामुळे तेथील साहित्य, उपकरणे, हरित परिसर आणि इतर सुविधा खराब होण्याची शक्यता आहे. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा योग्य वापर होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग आणि व्यायाम अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, योगा पार्क तातडीने सुरू करून नागरिकांना त्याचा लाभ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.













