- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी संभाजीनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
बैठकीत नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर पाणीपुरवठा, स्ट्रॉम वॉटर, झाडांची छाटणी, भटकी कुत्री, वाहतूक आणि पार्किंग यांसारख्या समस्या मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम आणि तुषार हिंगे उपस्थित होते. पावसाळ्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत असल्याचे अनुराधाताई गोरखे यांनी सांगितले.














