न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ मे २०२६) :- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या घरगुती गॅस पाईपलाईन जोडणी कामांसाठी कुशल प्लंबर्सची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असून, त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मोरवाडी येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम व भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लंबर्सची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्लंबर ट्रेडमधील आजी व माजी विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने या क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. एमएनजीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी घरगुती गॅस पाईपलाईन जोडणी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. इच्छुक प्लंबर्सना एमएनजीएलकडून दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर अनुभवी प्लंबर्सच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष साईटवर काम शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवड झालेले प्लंबर्स एमएनजीएलच्या अधिकृत व्हेंडर्स अंतर्गत काम करणार आहेत. त्यांच्या कामामध्ये एमसीव्ही टू इंस्टॉलेशन, मीटर इंस्टॉलेशन, कॉपर पाईपिंग आणि किचन कन्वर्जन यांसारख्या कामांचा समावेश असेल. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम केल्यास भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच जॉब वर्कनुसार महिन्याला ७० हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळू शकते, अशी माहितीही देण्यात आली.
या मेळाव्यात संस्थेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याची उत्सुकता दर्शविली. अधिक इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयटीआय प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमात एमएनजीएलचे उपप्रबंधक ओम उगले व उपप्रबंधक अमोल वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन गटनिदेशक शर्मिला काराबळे, रवी ओव्हाळ, निदेशक किसन गावडे, विक्रम काळोखे आणि विशाल रेंगडे यांनी केले.















