- तिघा महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २७ मे २०२६) :- स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. रहाटणी येथील ‘सुविधा स्पा’ वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे, तर तीन पीडित महिलांची या चक्रातून सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी रात्री ९:५६ च्या सुमारास काळेवाडी-रहाटणी रोडवरील अंबिका कॉम्पलेक्समधील शॉप नंबर ६ येथे असलेल्या ‘सुविधा स्पा’वर ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, हे स्पा सेंटर एका गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी सुरू होते. या स्पाच्या पूर्वेस अवघ्या १० मीटर अंतरावर ‘जीवनज्योती हॉस्पिटल’ आहे, तर उत्तरेस २० मीटर अंतरावर डॉ. ए.डी. बोऱ्हाडे यांचे ‘प्रथमेश क्लिनिक’ आहे. अशा सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरात आरोपी राजरोसपणे वेश्याव्यवसाय चालवत होता.
या प्रकरणी पोलिसांनी अजित गोरक घोळप (वय ३७ वर्षे, रा, हिंजवडी, मूळ फलटण, सातारा) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा पीडित तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार संतोष सूर्यकांत म्हस्के (वय ४३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वाकड/काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) मेटे करत आहेत.














