- अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- “शिक्षणाचा मूळ उद्देश केवळ साक्षरता किंवा पदवी मिळविणे हा नसून, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून त्यांना जबाबदार व सक्षम नागरिक बनविणे हा आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होत असून, हे बदल स्वीकारून नव्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,” असे प्रतिपादन अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसरचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.के. एस. पाटील यांनी केले.

५ सप्टेंबर रोजी दहीहंडीची सरकारी सुट्टी आल्याने शनिवार, दि.१२ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांना शुभेच्छा देताना प्रा. पाटील बोलत होते. सक्षम, सुशिक्षित आणि सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत ज्ञानदानाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे शाळेतील वातावरण चैतन्यमय झाले होते. विद्यार्थी-शिक्षकांमध्ये जबाबदारीची भावना, आत्मविश्वास आणि उत्साह प्रकर्षाने जाणवत होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून सृजन फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी जवळपास 100 शिक्षक व कार्यालयीन शिक्षकेतर वृंद यांना मान्यवरांच्या हस्ते
गुलाबपुष्प व पुस्तक भेट देवून सन्मानित करण्यात आले.
शाळेच्या आजवरच्या सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येक शिक्षकाने दिलेल्या योगदानाचा, तसेच त्यांच्या अंगी असलेल्या गुणवैशिष्ट्यांचा अगदी खुमासदार, आपुलकीपूर्ण आणि मिश्कील शैलीत प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केलेला गौरवपूर्ण उल्लेख हे या शिक्षक सन्मान सोहळ्याचे खास आकर्षण आणि अविस्मरणीय वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक शिक्षकाच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची त्यांनी केलेली मनमोकळी प्रशंसा उपस्थितांची दाद मिळवून गेली.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अवनी पाटील हिने प्राचार्याची, तर श्रेया पाटील हिने उपप्राचार्याची भूमिका बजावली.
यावेळी बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका अपेक्षा जाधव यांनी शाळेतील आनंदी व आपुलकीचे वातावरण पाहून “ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविती लळा, जसा माऊली बाळा” या ओळींची आठवण होत असल्याचे सांगितले. शाळेने सात वर्षांची वाटचाल पूर्ण करत प्रगतीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसरचे सेवानिवृत्त उपप्राचार्य बी. एस. पठारे, सेवानिवृत्त प्राध्यापिका दिपाली शिरुरकर, वाघिरे महाविद्यालय, सासवडचे सेवानिवृत्त प्राध्यापक मंगेश जगताप, श्री संदिप शिंदे तसेच सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, संचालक प्रशांत काळोखे, उपप्राचार्या शैलजा स्वामी, श्री अमोल येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी केले, तर सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी सूत्रसंचालन केले.


















