- फॉर्च्युनर आणि स्विफ्ट कारवर अनधिकृत ओळखचिन्ह लावून व्हीआयपी सवलतीचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- महाराष्ट्र विधानसभा सदस्य अर्थात आमदार असल्याचा भास निर्माण करण्यासाठी वाहनांवर अनधिकृतपणे विधानसभा सदस्यांचे ओळखचिन्ह व लोगो लावून फिरणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र कारवाई केली. भोसरी वाहतूक विभाग आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत १२ सप्टेंबर रोजी या कारवाया करण्यात आल्या.
भोसरी वाहतूक विभागाच्या हद्दीत नाशिक-पुणे रोडवरील भोसरी वाहतूक कार्यालयासमोर विशेष मोहिमेदरम्यान एमएच १४ केयू ००५५ क्रमांकाची काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार आढळून आली. या वाहनाच्या पुढील व मागील काचेवर कोणतीही परवानगी नसताना ‘मा. आमदार विधानसभा महाराष्ट्र राज्य मुंबई’ असा छापील लोगो लावण्यात आला होता. आर्थिक फायदा मिळविण्यासह व्हीआयपी सवलत मिळावी, या उद्देशाने लोगो लावल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी कृष्णा गोविंद अंबर (वय २६, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) आणि मालती महादेव चव्हाण (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्याविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाकड नाका, मुंबई-बंगळुरू महामार्गावर एमएच ०३ एएम ३९२७ क्रमांकाच्या स्विफ्ट कारच्या पुढील डाव्या काचेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचे दर्शविणारे पांढरे-हिरवे ओळखचिन्ह लावल्याचे आढळले. नईम इस्माईल शेख (वय ५०, रा. चिंचवड) याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम २०५ व संबंधित मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

















