- पोलिसाच्या बोटाला चावा..
- दिघीतील अलंकापुरम चौकातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावर भांडण करून गोंधळ घालणाऱ्या तरुणाने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या हाताच्या करंगळीला चावा घेतल्याची घटना दिघी परिसरात घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी रोडवरील अलंकापुरम चौक येथे आरोपी अनिकेत महेंद्र तिडके (वय २१, रा. महादेव नगर, लांडेवाडी, भोसरी) हा मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावर भांडण करून गोंधळ घालत होता.
यावेळी दिघी-आळंदी वाहतूक विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त असलेले पोलीस शिपाई वैभव गोरख काकडे (वय ३३) यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोपीला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने काकडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला जोरात चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १२ सप्टेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.


















