- बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे तयार करून पाच जणांची १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. प्रतीक राजेश धायींजे (वय २६, रा. भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकाला १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर फसवणूक झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी प्रतीक धायींजे याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे सांगून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे दिल्याचे समोर आले.
आरोपीचा शोध घेतल्यानंतर तो भोसरीतील शिवरोड, धावडेवस्ती परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात यापूर्वीही म्हाडामध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात त्याने २२ लाख ४१ हजार ७६० रुपये उकळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२)(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील तपासासाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने केली.


















