- दिघीतील आर.के.एल. स्कूलसमोरील घटना..
- चालक वाहनासह पसार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ सप्टेंबर २०२६) :- भरधाव आणि निष्काळजीपणे हायवा चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दिघी परिसरात घडली. अपघातानंतर हायवा चालकाने जखमी तरुणीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गोडावून चौकाकडून अलंकापुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आर.के.एल. स्कूलसमोर हा अपघात झाला. साक्षी दिनेश चौभे (वय २६, रा. दिघी परिसर) या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या हायवा क्रमांक एमएच १४ केए ८६७७ वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
धडकेनंतर साक्षी यांच्या छातीवर, डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता मदत न करता वाहनासह पलायन केले.
या प्रकरणी मृत तरुणीचे काका उमेश महेंद्र चौभे (वय ४४) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हायवा चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.


















