- परंतु, त्या निवृत्त अधिकाऱ्याच्या अनधिकृत हस्तक्षेपाच काय?..
- कोट्यवधींचा सल्लागार खर्च थांबविण्यासाठी हवं पारदर्शक धोरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी सल्लागार नेमण्याच्या प्रथेला आळा घालण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतला आहे. महापालिकेत सक्षम अधिकारी आणि अभियंते उपलब्ध असताना बाह्य सल्लागारांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च थांबविण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
मात्र, या निर्णयासोबतच महापालिकेच्या वर्तुळात आणखी एका चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेचे निवृत्त सहशहर अभियंता देवण्णा गट्टुवार हे कोणतेही अधिकृत पद नसताना स्थायी समितीच्या कार्यालयात वारंवार उपस्थित राहत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही कर्मचारी आणि राजकीय वर्तुळातून त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एकीकडे सल्लागारांवरील अवलंबित्व कमी करण्याची भूमिका मांडली जात असताना दुसरीकडे निवृत्त अधिकाऱ्यांच्या कथित मार्गदर्शनाची गरज का भासतेय?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तथापि, गट्टुवार यांच्याकडे कोणतीही अधिकृत जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान, सल्लागार नियुक्ती, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अनधिकृत हस्तक्षेपाच्या चर्चांबाबत महापालिका प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.















