- विद्यार्थ्यांना मिळाले आरोग्य व सुरक्षिततेचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :-चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या सखी सावित्री समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि महिला सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या दुहेरी कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पिंपरी पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाच्या ललिता फडतरे व ज्योती चापुडे यांनी विद्यार्थिनींना महिला सुरक्षा, आपत्कालीन महिला हेल्पलाईन, सायबर सुरक्षितता तसेच स्वसंरक्षणाचे मूलभूत धडे दिले. “तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. घाबरू नका, प्रसंगी आवाज उठवा. दामिनी पथक तुमच्यासाठीच आहे,” असा विश्वास त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
तसेच, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सत्राचे आयोजन करण्यात आले. किमया आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे मेजर राजू ढमाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना सूक्ष्म व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रशिक्षण दिले. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी दररोज किमान १५ मिनिटे योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. योगामुळे ताण कमी होतो, एकाग्रता वाढते आणि परीक्षेच्या काळात मन शांत राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार आणि प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक डॉ. शबाना शेख व प्रा. रुची यादव यांनी केले. यावेळी उपस्थित तज्ज्ञ प्रशिक्षक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच विभाग प्रमुख डॉ. श्रुती गणपुले यांचे मार्गदर्शन लाभले. अशा प्रकारे आरोग्य, सुरक्षा आणि जनजागृतीचा संदेश देणारा दुहेरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.















