- कचरा व एसटीपी नियमांवरून संघर्ष पेटला?..
- दंड, नळजोड खंडित करण्याच्या कारवाया आणि नव्या नियमांमुळे सोसायट्यांमध्ये अस्वस्थता…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :-पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आणि महापालिका प्रशासन यांच्यात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) नियमांच्या अंमलबजावणीवरून संघर्ष तीव्र झाला आहे. महापालिकेने नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, काही सोसायट्यांचे नळजोडही खंडित करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या भूमिकेनुसार, मोठ्या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि एसटीपी कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या अटींची अंमलबजावणी करताना आर्थिक भार वाढत असल्याचा दावा सोसायटी प्रतिनिधींनी केला आहे.
एकीकडे नियमांचे पालन करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत दिली जात असली, तरी दुसरीकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प, एसटीपी देखभाल आणि अतिरिक्त खर्चामुळे रहिवाशांवर आर्थिक ताण वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने सामायिक कचरा प्रक्रिया केंद्रे, अनुदान योजना आणि तांत्रिक मदतीची मागणी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, नियम मोडणाऱ्यांवर पुढील काळात अधिक कठोर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापालिका आणि सोसायट्यांमधील शीतयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















