- शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू; अन्यथा कारवाईचे संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने नियमभंग, शस्त्रांचा गैरवापर, गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच प्रशासकीय कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानंतर संबंधित परवानाधारकांकडील बंदुका, पिस्तुले व अन्य शस्त्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या असून, संबंधितांकडून तातडीने शस्त्रे जमा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांनी अद्याप शस्त्रे जमा न केल्याने पोलिसांकडून सातत्याने संपर्क साधला जात आहे.
कायद्यानुसार परवाना रद्द झाल्यानंतर शस्त्र स्वतःकडे ठेवणे बेकायदेशीर ठरू शकते. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शस्त्र परवान्यांबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारण्यात आले आहे. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.















