- पिंपरी, चिंचवड, भोसरी, दापोडी आणि काळेवाडी परिसर टार्गेट..
- स्वस्ताच्या मोहात वाहनचालकांचा जीव धोक्यात…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :-पिंपरी-चिंचवडमधील वाहन स्पेअर पार्ट्सच्या बाजारात बनावटी मालाचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपरी, भोसरी, चिंचवड, दापोडी आणि काळेवाडी परिसरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावटी स्पेअर पार्ट्सची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये स्पेअर पार्ट्सचे असेंबलिंग करून नामांकित कंपन्यांच्या नावाने पॅकेजिंग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
इंजिन ऑइल फिल्टर, ब्रेक पॅड, क्लच प्लेट, शॉक अॅब्झॉर्बर, स्पार्क प्लग, बॉल बेअरिंग, हेडलाइट आणि इतर महत्त्वाच्या पार्ट्सची बनावट उत्पादने बाजारात खुलेआम विकली जात आहेत. मूळ कंपनीच्या उत्पादनासारखेच पॅकेजिंग आणि लोगो असल्याने ग्राहकांची सहज फसवणूक होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा बनावटी पार्ट्समध्ये आवश्यक दर्जा आणि मजबुती नसल्याने वाहन चालविताना गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. ब्रेक निकामी होणे, सस्पेन्शन तुटणे किंवा इंजिनचे नुकसान होणे यांसारख्या घटना घडू शकतात.
स्वस्त दरांच्या मोहात ग्राहक नकळत बनावटी माल खरेदी करत असले तरी हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून वाहनचालकांच्या जीवाशी खेळ असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी या काळ्या बाजारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.















