- महापालिकेतील तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय फेररचनेअंतर्गत आठ क्षेत्रीय कार्यालयांचे दहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रूपांतर करण्यात आले असून, त्यानुसार तब्बल 272 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली असून, 1 जुलै 2026 पासून नव्या क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीनुसार कामकाज सुरू होणार आहे.
बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 75 कनिष्ठ अभियंते, 36 उपअभियंते, 103 लिपिक आणि 58 मुख्य लिपिकांचा समावेश आहे. नव्याने स्थापन झालेल्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळाचे योग्य नियोजन व्हावे आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा मिळावी, या उद्देशाने ही फेरबदल करण्यात आली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, पूर्वीप्रमाणे अ ते ह क्षेत्रीय कार्यालये त्याच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. नव्याने स्थापन करण्यात आलेले ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय ताथवडे येथील महापालिकेच्या वाहनतळ इमारतीत सुरू होणार आहे. तसेच ‘ल’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी येथील संत तुकारामनगर पोलिस ठाण्यासमोरील म्हाडाच्या इमारतीत कार्यान्वित करण्यात येणार आहे. दरम्यान, आवश्यकतेनुसार उर्वरित कर्मचाऱ्यांच्याही बदल्या टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.















